विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासकीय आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. ( After Dhananjay Munde resignation the charge of the Food and Civil Supplies Department will once again be with Chhagan Bhujbal.)
धनंजय मुंडे यांनी अलीकडेच या खात्याचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तात्पुरता कारभार देण्यात आला होता. मात्र आता ही जबाबदारी पुन्हा एकदा अनुभवी नेते छगन भुजबळांकडे सोपवण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली.
पद न मिळाल्यामुळे असमाधानी असलेल्या भुजबळांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी मंत्रिमंडळात डावलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावर फडणवीसांनी त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये भुजबळ यांच्याकडे हेच खाते होते, परंतु महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने हे खाते धनंजय मुंडेंकडे देण्यात आले होते.
नवीन आदेश मिळाल्यानंतर भुजबळ म्हणाले, “मला आत्ताच माहिती मिळाली की नोटिफिकेशन निघालं आहे. मी मुंबईकडे निघालो असून तात्काळ चार्ज स्वीकारणार आहे. यासोबतच विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “कोरोना काळात सगळे घरी असताना मी शेवटच्या गावापर्यंत धान्य पोहोचवलं. कुठेही तक्रार येऊ दिली नाही. आता पुन्हा हीच जबाबदारी घेतोय, तर घोटाळा होणार नाही याची काळजी घेईन आणि गरजूंना गुणवत्तापूर्ण अन्नधान्य मिळावं यासाठी प्रयत्नशील राहीन. शिवभोजनाबाबत काही तक्रारी असतील तर त्यावर तात्काळ उपाय केले जातील. माझा उद्देश स्पष्ट आहे की राज्यातील भटक्या, मागास समाजातील लोकांनाही तत्काळ रेशन कार्ड व धान्य वाटपाची सुविधा उपलब्ध करून देणे.