विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुजोर वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलीस एआय कॅमेरांद्वारे थेट दंडाच्या पावत्या फाडणार आहेत. पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता एआय मार्फत नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सध्या प्रायोगिक तत्वावर एफसी रोडवर वैशाली हॉटेल समोर एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. (AI cameras to fine drivers who violate traffic rules)
शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई अधिक अचूक आणि कार्यक्षमपणे करणे, हा या मागचा हेतू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग ओळखणे, त्याची नोंद ठेवणे आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचे काम याद्वारे केले जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार याचे उद्घाटन होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार असले तरी यामध्ये त्रास नियम पाळणाऱ्या वाहन चालकांनाही होणार आहे.
पुण्यात अनेकदा पाठीमागून येणारे हुल्लडबाजी करणारे वाहनचालक इतरांना वाहतुकीचे नियम पाळण्यापासून परावृत्त करतात. असे अनेक प्रकार खासकरून सिग्नलवर घडत असतात. एखाद्याने सिग्नल पाळला तर त्याला शिवीगाळ केली जाते, अश्लील हातवारे केले जातात. दमबाजी केली जाते. मोठमोठ्याने हॉर्न वाजवून त्याला त्रासही दिला जातो. यामुळे तो नियम पाळणारा वाहनचालक जिवाच्या भीतीने बाजुला होतो किंवा सिग्नलवर पहिल्याच रांगेत असेल तर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेतो आणि त्या वाहनचालकाला वाट मोकळी करून देतो. असे झाले तर एआय कॅमेरा मागचा पुढचा विचार न करता या गुंडगिरीला बळी पडलेल्या वाहनचालकालाही दंड करणार आहे.