विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :इस्रायल-इराण संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच भारत सरकारने वेळेत हस्तक्षेप करत एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन पार पाडले आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या परत आणण्याचे काम आर्मेनियाच्या मदतीने पार पाडण्यात आले. या अंतर्गत काश्मीरमधील ९० वैद्यकीय विद्यार्थी बुधवारी रात्री आर्मेनियातील येरेवनहून एअर इंडियाच्या विशेष उड्डाणाने दिल्लीला पोहोचले. ( Airlift from Armenia successfulIndian students in Iran return home safely)
ही कारवाई परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखालील तात्काळ निर्णय आणि भारतीय दूतावासाच्या सतर्कतेमुळे शक्य झाली. विशेष म्हणजे, युद्धसदृश स्थितीतून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय राजनैतिक संपर्क वापरत इराणमधून विद्यार्थ्यांना आधी सुरक्षित आर्मेनियात हलवले आणि नंतर तिथून हवाई मार्गे मायदेशी परत आणले.
उर्मिया, तेहरान मेडिकल युनिव्हर्सिटी, इस्लामी आझाद युनिव्हर्सिटी, शहीद बेहेश्ती मेडिकल कॉलेज अशा विविध इराणी विद्यापीठांतील भारतीय विद्यार्थ्यांना प्रथम सुरक्षित शहरांत हलवले गेले. कोम, शिराज, इस्फहान, अराक येथे त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भारत सरकारचे विशेष आभार मानत सांगितले की, “अशा संकटात भारताने आमच्यापर्यंत पोहोचून आमचा जीव वाचवला.”
भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या आर्मेनियाच्या राजदूतांशी थेट चर्चा करून सीमारेषेवरील नॉरदूज (Norduz) चेकपॉईंटवरून भारतीय विद्यार्थ्यांना बसेसद्वारे बाहेर काढले. सध्या इराणमधील सर्व विमानतळ बंद आहेत, मात्र भू-सीमा खुल्या आहेत. याचाच लाभ घेत भारताने आर्मेनियामार्गे एअरलिफ्टची योजना आखली. आर्मेनिया आणि भारताचे संरक्षण व राजनैतिक संबंध अत्यंत सकारात्मक आहेत. आर्मेनिया स्थिर देश असून इराणमधील उत्तरेकडील शहरांपासून त्याचा भूसीमा संपर्क जवळचा आहे. येरेवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत असल्याने भारतात थेट उड्डाण शक्य झाले. आर्मेनियाने तातडीने परवानगी दिल्यामुळे हे एअरलिफ्ट ऑपरेशन लवकर पार पडले.
भारत सरकारने इराणमध्ये अडकलेल्या उर्वरित भारतीय विद्यार्थ्यांसाठीही मदतकार्य सुरु केले आहे. सुमारे १०,००० भारतीय, त्यातील १५०० काश्मीरी विद्यार्थी, इराणमधील विविध भागांमध्ये अडकले आहेत. भारताच्या दूतावासाने सर्व भारतीयांना घरात सुरक्षित राहण्याचे व टेलिग्रामच्या अधिकृत चॅनेलवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.