विशेष प्रतिनिधी
अकोला : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातातून अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. अपघातावेळी ती मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने ती जागी झाली संपूर्ण परिसरात धुराचे लोट आणि गोंधळ होता. मात्र, धीर न सोडता तिने स्वतःभोवती ब्लँकेट लपेटले आणि धूर आणि अंधारातून मार्ग काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. ( Aishwarya from Akola narrowly escapes Ahmedabad plane crash escapes from the smoke by wrapping herself in a blanket)
ऐश्वर्या सध्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्यावरून अहमदाबादला परतली होती.
अपघाताच्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये झोपलेली असताना अचानक प्रचंड मोठा आवाज झाला. काही क्षणातच संपूर्ण इमारत धुराने व्यापली. सुरुवातीला काहीच समजत नव्हते, पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिने प्रसंगावधान राखत स्वतःला ब्लँकेटमध्ये लपेटले. धूर आणि उष्णतेमुळे अनेकांचे चालणे शक्य नव्हते. मात्र ती धीटपणे मार्ग शोधत पाचव्या मजल्यावरून खाली आली.
या घटनेत ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर किरकोळ भाजल्याचे जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने तिची प्रकृती स्थिर आहे.
घाबरलेल्या अवस्थेत तिने तात्काळ आपल्या वडिलांना अमोल तोष्णीवाल यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अपघाताच्या क्षणी काय परिस्थिती होती हे सांगताना ऐश्वर्याच्या डोळ्यांत त्या प्रसंगाची भीती स्पष्ट दिसत होती.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान कोसळून बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जाणारे हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटातच कोसळले.