विशेष प्रतिनिधी
मुंबई : लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती. यांची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. कारवाईचा बडगा उगारत सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. ( Ajit Pawar orders Suraj Chavan to resign)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते भिरवकल्यानंतर रविवारी (छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. अजित पवारांनी चव्हाणांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भातील पोस्ट त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे.
अजित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.
चव्हाण यांच्यावर पक्षाने कारवाई केली असली तरी त्यांना अटक करावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बेलगाम झालेल्या युवक प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा घेतला ही स्वागतार्ह बाब आहे. पण त्यांनी दुधाची भूक ताकावर भागवण्यासारखा प्रकार करू नये. मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी फक्त लहान माशाचा बळी देऊन चालणार नाही. अजितदादांनी मस्तवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घ्यावा अशी आमची मागणी आहे. कारण हे प्रकरण त्यांच्यापासूनच सुरू झाले. त्यामुळे बेजबाबदार, सभागृहाचा, शेतकऱ्यांना अवमान करणाऱ्या मंत्र्यांचाही राजीनामा घ्यायला हवा.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, १५ तासानंतर अजित पवारजी आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि मग आपण सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत त्याबद्दल जनता आपली आभारी आहे. त्यांच्यावर एफआयआर झाला, पण अटक कधी होणार ? ते आदेश आपण उपमुख्यमंत्री म्हणून द्यावेत.
दरम्यान झालेल्या प्रकारावर सुरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, महाराष्ट्राला यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.