विशेष प्रतिनिधी
पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी आहे. या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ( Ajit Pawar warns that strict action will be taken against the culprits after investigating the Kundmala bridge accident.)
मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळातील साकव पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत जवळपास वीस ते पंचवीस वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. , पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल आहे. त्यासोबतच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली असून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
कुंडमळा येथील घटनेतील पर्यटकांच्या मृत्युला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पूलाची मागणी केली होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली, असेही अंधारे यांनी म्हटले आहे.
ही घटना मन्न सुन्न करणारी असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. ही घटना का घडली? याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.