विशेष प्रतिनिधी
पुणे : गर्भवती तनिष भिसे मृत्यूप्रकरणातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह, या घटनेसाठी जे जबाबदार असतील त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. उशिरा का होईना डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला,असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ( All those responsible for Bhise death case should be punished demands Supriya Sule)
सुळे म्हणाल्या, या प्रकरणातील अहवाल म्हणजे हा रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते दुर्दैवी आहे. परंतु, महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही हीच आमची भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही याबाबत न्यायालयात देखील धाव घेतली आहे. हा काही राजकीय विषय नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी जे वक्तव्य केले होते, त्याबाबत माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या की मुख्यमंत्री आपल्या लेकीला न्याय देतील. मात्र पहिल्या दिवशी त्यांनी जे वक्तव्य केले व आज त्यांचे जे वक्तव्य आहे यात मोठा फरक आहे हे मोठे दुर्दैवी आहे. आता अहवालामध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर फोकस राहिला पाहिजे, कुठला अहवाल काय म्हणतो यात अडकायला नको असेही सुळे म्हणाल्या.
राज्यातील यवतमाळ येथील पाणी टंचाई बाबत बोलताना सुळे म्हणाल्या, पाणीटंचाई ही दुर्दैवी असून, जलजीवन मिशन नावाचा उपक्रम पूर्ण देशात राबवला गेला. पण राज्यात डबल इंजिनचं सरकार असून देखील पाण्याची अशी परिस्थिती आहे ही बाब खेदजनक आहे. पाण्याचं नियोजन ज्यावेळी होतं त्यावेळी सरकारने हे नियोजन योग्य का केले नाही लोक आज मर मरत आहेत हे राज्यकर्त्यांच अपयश आहे
बीडमध्ये नक्की काय सुरू आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न असल्याचे सुळे यांनी सांगून येथे पोलिसांचे भय कोणाला राहिले नाही. बीडमध्ये दहशत नेमकी कुणाची आहे. बीडमध्ये वर्दीला देखील कुणी घाबरत नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी एक बैठक घ्यावी हे सगळं गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे याचा मला आनंद आहे. कुटुंब एकत्र झाले आहे त्याचा आनंद साजरा करू द्या .हा सुस्कृत महाराष्ट्र आहे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटावा हीच आपली संस्कृती असल्याचे सुळे यांनी सांगितले. संग्राम थोपटे यांचा आज मेळावा आहे, हा मेळावा होऊ द्या त्यांनी काय करावे हे आपण कशाला ठरवायच, त्यांचा निर्णय येऊ द्या त्यांचा निर्णय आल्यावर मी यावर बोलीन असेही त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी, महादेव जानकर, बच्चू कडू मेळाव्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, काल बच्चू कडूंचा मला फोन आला होता आमचं बोलणं होऊ शकलं नाही. त्यामुळे प्रथम त्यांचं काय म्हणणं आहे हे मी समजून घेईन. अशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग आणि चर्चा झालीच पाहिजे असे मत सुळे यांनी व्यक्त केले.