विशेष प्रतिनिधी
मुंबई : समविचारी पक्ष आणि काँग्रेसच्या मूल्यांना आदर देणारे पक्ष असतील, तरच काँग्रेस त्यांच्यासोबत युती करेल,” असे स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त करत राज ठाकरे यांच्या मनसेवर आता भूमिका स्पष्ट करण्याचा पेच टाकला आहे. ( Alliance Only if Congress Values Are Accepted Harshvardhan Sapkal Puts MNS in a Dilemma)
शनिवारी मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र स्टेज शेअर केल्याने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युतीच्या शक्यतेवर राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मात्र स्पष्ट भूमिका घेतली आहे. आता मनसे काँग्रेसच्या विचारांना मान्यता देणार का हा प्रश्न आहे.
हा मेळावा केवळ मराठी विषयाच्या अनुषंगाने साजरा केलेला सांस्कृतिक जल्लोष होता, राजकीय आघाडीचा भाग नाही, असे सांगून सपकाळ म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी युती ही पूर्वीपासून अस्तित्वात आहे. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्यावर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. देशपातळीवरही भाजपविरोधी ‘इंडिया’ आघाडी उभी राहिली, त्यामध्ये काँग्रेस सहभागी आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसने कोणतीही आघाडी केली नाही. स्थानिक युतींचा निर्णय स्थानिक काँग्रेस नेतृत्वावर सोपवण्यात आला आहे.
सपकाळ यांनी सांगितले की, “काँग्रेस फक्त त्यांच्या सोबतच पुढे जाईल, जे पक्ष काँग्रेसच्या मूलभूत विचारधारेशी सहमत असतील. त्यामुळे, मनसेसोबत युती होईल की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाही, आणि काँग्रेसमध्ये यासंदर्भात स्पष्टता नसल्याचे दिसते.
सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हेच ठरत नाही. फेब्रुवारी, ऑक्टोबर की होणारच नाहीत? हा सगळा गोंधळ भाजप मूळ विषयांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी निर्माण करत आहे,
त्यांनी स्पष्ट केले की, महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा निर्णय स्थानिक काँग्रेस समितींवर सोपवण्यात आला आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही असे सांगून सपकाळ यांनी स्पष्ट केलं की, काँग्रेस मराठी भाषेच्या संरक्षणासाठी पूर्ण कटिबद्ध आहे.