विशेष प्रतिनिधी
पुणे : अमेरिकन नागरिकांना पुण्यातून सायबर गंडा घालत डिजिटल अरेस्ट करण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प पोलिसांनी या प्रकरणी खराडी येथील प्राईड आयकॉन इमारतीमधील एका बनावट कॉल सेंटरवर छापा मारून पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 100 हून अधिक भामट्यांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण गुजरातचे असल्याची माहिती आहे. यात काही तरुणींचाही समावेश आहे. ( American citizens cyber-scammed from Pune raid on a fake call center in Pride Icon building)
आरोपी अमेरिकेतील लोकांना डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. प्राईड आयकॉन इमारतीमधील बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी या कॉल सेंटरच्या माध्यमातून हे काम सुरू होते. पोलिसांनी शुक्रवारी रात्री या ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर हे कॉल सेंटरच बोगस असल्याचे निष्पन्न झाले. या कॉल सेंटरमध्ये गुजरातचे 100 ते 150 जण काम करत होते. त्यांचा मुख्य सूत्रधारही गुजरातचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या ताब्यातून 41 मोबाईल, 60 लॅपटॉप जप्त करण्यात आलेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या अनेक नागरिकांना सायबर गंडा घातला जात असल्याचा प्रकार घडत होता. पुण्यातील एका कॉल सेंटरच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या होत्या. त्यानुसार, पुणे पोलिसांच्या 150 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खराडी भागातील मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सलटन्सी नामक कॉल सेंटवर छापा टाकला. त्यानंतर अनेक जणांची चौकशी करून 5 प्रमुख व्यक्तींना अटक केली आहे.
आरोपी अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळत होते. त्यानुसार आरोपींच्या बँक खात्यावर मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचेही दिसून आले आहे. आता पोलिस या सर्व व्यवहारांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्वपूर्ण दस्तऐवजही जप्त केलेत. या कटाचा मूख्य सूत्रधार सध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.