विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर
छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली होती. मात्र मालेगाव दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः छगन भुजबळ यांना बोलावून स्वतः जवळ बसवून घेतले. शहा यांनी भुजबळ यांची समजूत काढल्याची चर्चा आहे.
त्यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नाशिक दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांनी मालेगावच्या अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला भेट दिली. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार परिषदेच्या माध्यमातून अमित शाह यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. अमित शाह हे या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यावर त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे बघितले. यानंतर अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना बोलवीत आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाद देखील झाला. अमित शाह यांच्या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर ते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढत असल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात छगन भुजबळ गेले होते. मात्र ते अवघ्या दोन तासात शिर्डीतील शिबिरातून माघारी परतले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली होती. यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.