विशेष प्रतिनिधी
बीड : आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग सतीश भोसलेवर काढला जात आहे. वड्याचे तेल वांग्यावर निघाले आहे. त्यांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले, ते कुणालाही मान्य होणार नाही, असा आरोप सतीश उर्फ खोक्या भोसलेचे वकील अंकुश कांबळे यांनी केला आहे. ( Anger against MLA Suresh Dhas is being vented on the Khokya, alleges lawyer)
सतीश उर्फ खोक्या भोसलेला सहा दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. शुक्रवारी खोक्याला प्रयागराज येथून आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्याच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण, न्यायालयाने सहा दिवसांची म्हणजे 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खोक्यावर मारहाणीसह वन्य प्राण्यांच्या शिकारीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल होताच खोक्या फरारी झाला होता. सहा दिवसांनी बीड पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून अटक केली. शुक्रवारी सकाळी त्याला बीडमध्ये आणण्यात आले. त्यानतंर वैद्यकीय चाचणी केल्यावर त्याला न्यायालयापुढे हजर केले.
वकील अंकुश कांबळे म्हणाले, “सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. तो पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एखाद्या मागासवर्गीयाने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? बीडमध्ये सध्या जे काही जातीचे राजकारण सुरू आहे, त्याचा सतीश भोसले हा बळी ठरला आहे. तो सामाजिक कार्यकर्ता आहे. गरीबांच्या पोरांना वह्या पुस्तके वाटपण करणे, ऊसतोड कामगारांना रेशन धान्य पुरवणे, गरिबांना मदत करणे, अशी कामे सतीश भोसले करतो. त्याचे चांगले काम समोर आणले जात नाही. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत.