विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी खरेदीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराचा पुराव्यासह पाढा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी वाचून दाखविला आहे. मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दमानिया म्हणाल्या, एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे. थेट लाभ हस्तांतर योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देतं, त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो.नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला.
अंजली दमानिया यांनी या उत्पादनांची मूळ ऑनलाईन किंमत पत्रकारांना दाखवली. ते उत्पादन विकत घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी वाढीव पैसे आकारल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, ही उत्पादने इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो एरियाचा १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या.
नॅनो डीएपीची किंमत ५२२ रुपये एक लिटर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरची बॉटल ही केवळ २६९ रुपयाला मिळते. एकूण बॉटल घेतल्या १९ लाख ५७ हजार ४३८ घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये, पण कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. हे दोन्ही घोटाळे ८८ कोटींचे आहेत” असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
“बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो २४५० रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर २९४६ रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडर काढलं. ३४२६ रुपयाला त्यांनी ही बॅटरी विकत घेतली. एक हजाराच्या वर एक एक बॅटरी स्पेअर कमावले”, असं म्हणत अंजली दमानिया म्हणाल्या, डीबीटी योजनेत ५ लाखांहून अधिक लाभार्थी होणार होते. यासाठी बजेट ठरलं होतं. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
“गोगलगायीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचं नुकसान होतं. मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं पेटेंटेड उत्पादन आहे. हे उत्पादन बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळतं. रिटेलमध्ये आता या उत्पादनाचं दर ८१७ रुपयाला आहे. पण कृषी मंत्री मुंडेंनी १२७५ रुपयाला विकत घेतलं. एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो विकत घेतलं. कॉटन स्टोरेज बॅग ६ लाख १८ हजार घेतल्या. काही दिवसापूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी २० बॅगा घेतल्या. ५७७ रुपयाला. पण मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयाला घेतल्या. ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी रुपये सरळ सरळ गेले. मी ऑनलाइन उपलब्ध असलेले दर सांगतेय. हे दर रिटेलचे आहेत. पण ही उत्पादने बल्कने घेतली तर २० टक्के अधिक आहेत. इतके महान कृषी मंत्री आहेत. एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
हे सर्व पुरावे मला भगवान गडावर दाखवायचे आहे. नम्रपणे दाखवायचे आहेत. आणि धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा मागे घेण्याची मागणी करायची आहे. तसंच, राजीनाम्याची मागणी त्यांनी करावी, अशी विनंती करेन असे अंजली दमानिया म्हणाल्या.