विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुती सरकारच्या काळात पायाभूत सुविधांच्या प्रकल्प उभारणीत अनेक विक्रम होत आहेत. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प’ महाराष्ट्रातील अभियांत्रिकी चमत्कार मानला जात आहे. या मार्गावर देशातील सर्वात लांब बोगदा साकारत आहे. ( Another record during the tenure of Fadnavis government the countrys longest tunnel is being built on the expressway)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्वितीय चमत्कार असून, यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ तब्बल अर्ध्या तासाने कमी होणार आहे, असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर घाटमार्ग टाळता येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रासही कमी होईल. प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायक होणार आहे. या प्रकल्पांतर्गत 9 किमी लांब आणि 23 मीटर रुंद असलेला देशातील सर्वात लांब बोगदा बांधण्यात येत आहे. यापूर्वी समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम हा बोगदा मागे टाकणार आहे. याशिवाय, या मार्गावर 185 मीटर उंच पूल बांधण्यात येत असून, तोही देशातील सर्वाधिक उंच पूल ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जवळ जवळ काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या अभियंते आणि कामगारांचे विशेष कौतुक करत प्रकल्पाच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.