विशेष प्रतिनिधी
मुंबई : हल्ली कुणीही उठून आपापल्या आकलनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनाला वाटेल तसा सांगत आहे. इतिहासाची प्रतारणा होईल, लोकभावनेस ठेच लागेल, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, याचे कुणालाही भान राहिलेले नाही. यावर ठोस उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा, अशी अपेक्षा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.
प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे म्हणाले, शासनाने शिवचरित्राचे संशोधक, अभ्यासक व चिकित्सक यांची संशोधन समिती स्थापन करून भक्कम संदर्भांवर आधारित शासकीय चरित्रग्रंथ प्रकाशित करावा, जेणेकरून शिवचरित्रावरील व्याख्याने, मालिका, नाटक, चित्रपट आदी सर्व साहित्यांस हा शासकीय चरित्रग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल आणि इतिहासाविषयी वादंग उठणार नाही. याविषयी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी. मी या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे.
दरम्यान, राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत बोलताना आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती असे विधान केले होते. युमुके त्यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत खासदारउदयनराजे म्हणाले, केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होतात. काय असं विधान केलं. हा राहुल सोलापूरकर कोण आहे. तो जो म्हणाला लाच. जे लाच घेतात यांना लाचे पलीकडे काही समजत नाही. असं बोलतांना जिभेला हाड नसतं माहीत आहे. लावली जीभ टाळूला काहीही बोलायचं. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजे. महापुरुषांबद्दल अशी विधानं करतात अशा लोकांना दिसेल तिथे ठेचलं पाहिजे. वेचून ठेचलं पाहिजे. अशा विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मात अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होते.