विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळात संविधानाची हत्या करण्यात आली आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यात आले. एक लाखाहून अधिक लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. ६० लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली हे सर्व त्यांच्या पूर्वजांनी केले असेल तर त्यांच्या नावाने माफी मागितली पाहिजे, असा निशाणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता साधला आहे. (Apologize for the actions of ancestors during the Emergency RSS Sarkaryawah Dattatreya Hosabale targets Rahul Gandhi)
आणीबाणीच्या ५० वर्षांनिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना होसाबळे म्हणाले, मूळ संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. आणीबाणीच्या काळात देशात संसद आणि न्यायपालिका दोन्ही कार्यरत नव्हती. या काळात हे दोन शब्द जोडले गेले. हे शब्द राहावेत की नाही यावर वादविवाद झाला पाहिजे.
‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले होते. याच काळात देशात आणीबाणी होती. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. ती २१ मार्च १९७७ पर्यंत म्हणजेच २१ महिने लागू होती. भाजप हा दिवस संविधान हत्येचा दिवस म्हणून साजरा करते.
आणीबाणीच्या काळात संविधानाची हत्या करण्यात आली आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यात आले असा आरोप करत होसाबळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आणीबाणीच्या काळात एक लाखाहून अधिक लोकांना तुरुंगात टाकण्यात आले, २५० हून अधिक पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आले, ६० लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यात आले. जर हे सर्व त्यांच्या पूर्वजांनी केले असेल तर त्यांच्या नावाने माफी मागितली पाहिजे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आणीबाणीबद्दल लिहिले आहे की, हा भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळा अध्याय आहे. भारतातील लोक हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतात. भारताच्या लोकशाही रचनेचे रक्षण करणे आणि ज्या आदर्शांसाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन समर्पित केले ते राखणे हे आपले कर्तव्य आहे.