विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर एका चोरट्याने चाकूने वार केले. त्या चोरट्याला पोलिसांनी अटकही केली आहे. तो बांगला देशी असल्याचे उघड झाले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी यावरून अमित शहा यांना लक्ष्य केले आहे.भारताच्या गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. दरोडेखोराने अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले होते. या घटनेनंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होतं. तर, दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत होते. दोन दिवसांनंतर या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना यश आलं असून आज आरोपीला त्यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलं. आरोपीला अटक केल्यावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव, तसेच प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असावा असा संशय व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री c यांना लक्ष्य केलं आहे. चतुर्वेदी म्हणाल्या, “भारताच्या गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे की त्यांनी देशाच्या सीमा इतक्या नाजूक करून ठेवल्या आहेत की बांगलादेशी केवळ बेकायदेशीरपणे या सीमा ओलांडून भारतात प्रवेश करत नाहीत तर आपल्या देशात दहशत पसरवत आहेत, गुन्हे करत आहेत. त्यांना सीमा ओलांडून भारतात प्रवेश करण्यास कोण मदत करतंय? इथे येऊन त्यांना शासकीय कागदपत्रं मिळवणं, नोकऱ्या मिळवणं आणि भयंकर गुन्हे करणं इतकं सोपं कसं काय? इतक्या सहजपणे बांगलादेशी भारतात या कारवाया कसे काय करतायत? इतर नेत्यांना देशद्रोही म्हणण्याआधी केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की स्थलांतर व घुसखोरी थांबवण्यात त्यांचं हे अपयश देशद्रोहाचंच कृत्य आहे”
चतुर्वेदी म्हणाल्या, “केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारही अनेक पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे. राज्यात बेकायदेशीरपणे येणाऱ्या स्थलांतरितांना शोधणे, त्यांची ओळख पटवून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य कारवाई करण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरलं आहे. डबल इंजिन सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे. गुप्तचर यंत्रणा व प्रशासनाचं हे मोठं अपयश आहे. ही घटना खूप लज्जास्पद आहे”.