विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकरी आंदोलनात उतरलेल्या प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आता हे आंदोलन मुंबईत करण्याची तयारी केली आहे. मुंबई एक दिवस बंद ठेवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साकडे घातले आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे. इथूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज उठावा. मुंबई शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे, अशी आमची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून अपेक्षा आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले. (Bachchu Kadus plea to Raj Thackeray to shut down Mumbai for a day)
कडू यांनी मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांचा विषय हाच आमच्यात संवाद होता. शेतकरी हा विषय एका पक्षाचा नाही, एका जातीधर्माचा नाही. शेतकरी सर्व जातीधर्माचा आहे. त्यामुळे मनसे यात पुढे आली तर निश्चितच शेतकरी आंदोलनाला बळ मिळेल. आमचा अजेंडा निवडणुकीचा नाही. मरणारा शेतकरी वाचवायचा आहे.
शेतकरी मुद्द्यावर कसं आणि कधी पुढे गेले पाहिजे, आंदोलन काय केले पाहिजे या सर्वांवर एकंदरीत चर्चा झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सरकार शेतकऱ्यांची टिंगलबाजी करतंय हे फार चुकीचे असल्याचे सांगून कडू म्हणाले, दुष्काळ पडला तर कर्जमाफीचा विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. दुष्काळ पडायची वाट शेतकऱ्यांनी पाहावी असं चित्र सरकारकडून उभे केले जात आहे. ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. दुष्काळापेक्षा जास्त नुकसान पिकाला भाव मिळत नाही म्हणून होत आहे. मागील २ वर्षापासून मालाचे दर घसरत आहेत हा विषय महत्त्वाचा असल्याने मराठवाड्यात आमची शेतकऱ्यांसाठी यात्रा निघणार आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी आंदोलनाला यावे, शेतकऱ्यांना संबोधित करावे असं बैठकीत सांगितले.
राजकारण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करायचे आहे. मेंढपाळ, मच्छिमार यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी विषयावर राज ठाकरेंचा अभ्यास दिसून आला. परंतु शेतकरी एकत्र येणार का अशी खंत आहे. शेतकरी एकत्र येत नाही आणि झाला तर राजकारणात होत नाही. शरद जोशींसारख्या माणसाला शेतकऱ्यांनी पाडले होते. हे दुर्दैवी होते. आम्ही लढतोय, राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढा देत आहेत, ते राजकारणात मागेच राहिले आहेत. तरीही राजकारण बाजूला ठेवून शेतकरी लढा उभा राहावा हा आमचा प्रयत्न आहे. ९ तारखेला रक्षाबंधन आहे. आम्ही शेतकऱ्यांकडून सरकारला वेदनेची राखी बांधणार आहोत. आत्महत्या कुटुंबातील महिला राखी बांधतील. रोज १०-१५ शेतकरी आत्महत्या करतायेत. एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले.