विशेष प्रतिनिधी
पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना सर्वोत्तम पॅकेज देण्याची ग्वाही दिली आहे. (Best package for Purandar Airport land acquisitionassures Revenue Minister Chandrashekhar Bawankule)
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सात गावांतील शेतकऱ्यांशी दोन तास चर्चा केली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.बावनकुळे म्हणाले, “कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन, त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच निर्णय घेईल. नागपूरच्या मिहान प्रकल्पाप्रमाणेच पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल व स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.”
शेतकऱ्यांनी जमिनीच्या किंमती, पुनर्वसन व इतर मागण्या स्पष्टपणे सात दिवसांत सरकारकडे मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. “सरकार सर्वोत्तम मोबदला देण्यासाठी तयार आहे. आंदोलनात निरपराध शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे चौकशीनंतर मागे घेतले जातील, पण अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होईल. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना बावनकुळे म्हणाले, “पुरंदरमधील सर्वेक्षण सध्या थांबवण्यात आले आहे. पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल.”
काही दलालांनी जमीन खरेदी केल्याच्या आरोपांबाबत त्यांनी सांगितले की, “सध्या तसे निदर्शनास आलेले नाही. तरीही चौकशी केली जाईल. एखाद्या दलालामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.”
व्हॉट्सअॅपद्वारे चुकीचे दर पसरवल्याच्या आरोपांवर त्यांनी सांगितले, “गैरसमज पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होईल. शासनाची भूमिका पारदर्शक असून, शेतकऱ्यांच्या हिताला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो.”
हा प्रकल्प राज्य व देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक असून, तो यशस्वीपणे पूर्ण केला जाईल, असा आत्मविश्वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.