विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील मराठी भाषेवर उधळलेल्या मुक्ताफळांवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोशी यांचा निषेध करणार का असा सवाल त्यांनी केला आहे. हा राजद्रोह असून औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Bhaiyyaji Joshi’s treason, will Devendra Fadnavis protest? Question by Sanjay Raut)
मुंबई येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात, असे वक्तव्य जोशी यांनी केले आहे.
भैय्याजी जोशी यांच्यावर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रीय स्वयसेवक संघ आणि भाजपची ध्येयधोरणे ठरवणारे भैय्याची जोशी मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नसल्याचे सांगतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने हे सहन कसे केले? भैय्याची जोशी म्हणतात, ‘मुंबईत येऊन कुणीही कुठलीही भाषा बोलू शकतात. घाटकोपरची भाषा गुजराती आहे.’ पण, असेच वक्तव्य भैय्याजी जोशी कलकत्ता, लखनऊ, चेन्नईत, लुधियाना, बंगळुरूमध्ये जाऊन बोलू शकतात का? महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते मुंबईची भाषा मराठी नसून गुजराती असल्याचे बोलतात. मराठी ही आमची राजभाषा आहे. अशा प्रकारचे वक्तव्य राजद्रोहात बसते. 106 हुतात्मांनी महाराष्ट्र, मुंबई आणि मराठीसाठी बलिदान दिले. हे ऐकण्यासाठी दिले का?”
राऊत म्हणाले, सध्याच्या सरकारला थोडातरी स्वाभीमान आहे का? मराठी राज्यगौरव गीत सरकारने सुरू केले आहे. याचे राजकीय कार्यक्रम केले जातात. मराठी भाषा दिन साजरे केले जातात. मुंबईत येऊन भाजपचे विचारधारा वाहक अशी भाषा करतात. हा मराठी स्वाभीमान, भाषा आणि अस्मितेचा अपमान आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही अधिकृत भूमिका नसल्याचे जाहीर करावे. तसे नसेल तर, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात भैय्याजी जोशी यांचा निषेध व्यक्त पाहिजे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार, सत्तेत बसलेले मिंधे कुठे आहेत? असा सवाल करून राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आयुष्य पणाला लावले. विचारवाहकांनी भैय्याजी जोशी यांचा निषेध करावा. औरंगजेबासंदर्भात शिंदेंनी भाषण केले. हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेला स्थान दिले आणि शब्दकोश तयार केला. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी भैय्याजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध केला पाहिजे. लाचार आणि मिंध्याचे सरकार बसल्याने असे बोलण्याची हिंमत भैय्याजी जोशी यांची होती.