विशेष प्रतिनिधी
पुणे : बावधन पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक करून अंधश्रद्धेच्या आडून सुरू असलेली एक धक्कादायक आणि अमानवी सायबर फसवणूक उघडकीस आणली आहे. हा बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप स्पायवेअर अॅप डाऊनलोड करून त्यांचं खासगी आयुष्य थेट मोबाईल कॅमेऱ्याद्वारे पाहात होता आणि त्यांचे खाजगी क्षण चित्रीत करत होता. आरोपीचा नाव प्रसाद उर्फ भीमराव तामदार (वय २९, रा. सुसगाव, मुळशी) असे असून, त्याच्यावर आयटी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Bhondubaba arrested for filming devotees private lives shocking type of cybercrime exposed)
तामदार हा बावधन परिसरात ‘दिव्य शक्ती’ असल्याचा दावा करत शेकडो भक्तांवर मानसिक प्रभाव टाकत होता. तो भक्तांना सांगायचा की, त्यांच्या जीवनात मोठे संकट येणार आहे, मृत्यू टळण्यासाठी विशिष्ट क्रिया करणं अत्यावश्यक आहे. या क्रियेच्या नावाखाली तो भक्तांना एकांतात बोलवून त्यांचा मोबाईल हातात घेत असे, पासवर्ड विचारून त्यामध्ये AirDroid Kid नावाचे एक हिडन अॅप इंस्टॉल करत असे.
हे अॅप एकदा मोबाईलमध्ये आले की, बाबाला त्याचा थेट कॅमेरा, माइक आणि लोकेशनवर नियंत्रण मिळायचे. यामुळे तो भक्त कुठे आहे, काय कपडे घातले आहेत, दिवसभरात काय केलं – हे सर्व माहिती बाबा फोनवरून त्यांनाच सांगत असे, त्यामुळे भक्तांचा त्याच्यावर विश्वास अधिक वाढत होता.
या प्रकरणाचा सर्वात घृणास्पद भाग म्हणजे, काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका हवी असल्याची विनंती केली असता, बाबाने त्यांना वेश्या किंवा प्रेयसीसह शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे संबंध ठेवताना मोबाईल विशिष्ट कोनात ठेवण्यास सांगत असे. यातून तो थेट चित्रीकरण करत होता.
एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी आपल्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राकडे दिला. त्या मित्राने लॅपटॉपच्या साहाय्याने तपास केला असता, मोबाईलमध्ये हिडन अॅप आढळले. त्याच्या माध्यमातून मोबाइल बाहेरून ऑपरेट होत असल्याचे लक्षात आले. संबंधित भक्ताला आपला मोबाईल केवळ बाबालाच दिल्याचे आठवले.
यानंतर इतर काही भक्तांशी संपर्क केला असता त्यांच्या मोबाईलमध्येही हेच अॅप असल्याचे निष्पन्न झाले. सर्व भक्तांनी एकत्र येत बाबाला जाब विचारला असता, त्याने तक्रार न करण्याची विनवणी केली. मात्र एका तरुण भक्ताने ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली. शुक्रवारी (२७ जून) बावधन पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली. अनेकांनी अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचे सांगितले. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीचा मोबाईल आणि त्यामध्ये वापरलेले अॅप्स तपासण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या डिजिटल पुराव्यांतून भक्तांचे आरोप सत्य असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता, आयटी ॲक्ट, आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीने भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले, कुठे शेअर केले, त्याचा वापर केला का याचा डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे. पोलिसांनी इतर संभाव्य पीडितांनीही पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.