विशेष प्रतिनिधी
मुंबई : फक्त जागावाटपात खेचाखेची करण्यासाठी आम्हाला आघाड्या नकोत. लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की फक्त जागावाटपामध्ये बिग ब्रदर नको. बिग ब्रदरचं काम हे समन्वयाचं आहे, फक्त जागावाटपामध्ये मोठा वाटा मिळवण्यात नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यानू काँग्रेसला सुनावले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप व काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायलाच लढले. त्यात मोदी-शहांचे फावले, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून संघर्ष झाला होता. राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांचा कलगीतुरा चांगलाच रंगला होता. याचा संदर्भ देऊन राऊत यांनी काँग्रेसला टोला मारला.
राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतील काँग्रेसच्या नेतृत्वानं पुढाकार घेणं आम्हाला अपेक्षित आहे, असे सांगून राऊत म्हणाले,
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत तरी इंडिया आघाडी एकत्र दिसेल का ? माझ्या माहितीप्रमाणे, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव हे आघाडीबाबत सकारात्मक आहेत, अखिलेश यादवही सकारात्मक दिसत आहेत. आमच्यासारख्या इतर पक्षांचीही सकारात्मक भूमिका आहे, कारण आम्ही ते लोकसभेला करून दखवलंय. लोकसभेला आम्ही महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशमध्ये एकत्र राहून, मोदींचं, भाजपचं आव्हान मोडून काढलं होतं. एकत्र असल्यावर आम्ही समोरचं आव्हान पेलून त्यांचा पराभव करू शकतो,
बटेंगे तो कटेंगे हा संदेश नरेंद्र मोदींनी फक्त देशाला नव्हे तर इंडिया आघाडीलाही दिला. लोकसभेला इंडिया आघाडी सर्व राज्यांमध्ये एकत्र लढली पण विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र इंडिया आघाडीचं गणित जमलं नाही, त्याचा फटका बसला. म्हणजे राज्य भाजपच्या हातात द्यायची का ? असा सवाल करत आघाडीतील बिघाडीवरून राऊत यांनी कानपिचक्या दिल्या. इंडिया आघाडी सध्या फक्त ससंदेत दिसत्ये, पण विविध प्रश्नांसाठी इंडिया आघाडीने एकत्र येण्याची, मजबुतीने टिकण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतील आमचा बिग ब्रदर आहे, मोठा भाऊ आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे, 100 जागा त्यांच्याकडे आहेत, आणि 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, पण ते केव्हा जेव्हा आम्ही ( सगळे) एकत्र असू तेव्हाच, असेही ते म्हणाले.