विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीर सरकारने कडक उपाययोजना आखल्या आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, काश्मीर खोऱ्यातील सुमारे ५० पर्यटनस्थळे आणि ट्रेकिंग मार्ग तात्पुरते बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
( Big decision after Pahalgam attack 50 tourist spots in Jammu and Kashmir temporarily closed for tourists)
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पर्यटनस्थळी पुरेशी सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी पर्यटकांचा प्रवेश थांबवण्यात येत आहे. बंद करण्यात आलेल्या प्रमुख ठिकाणांमध्ये गुरेज व्हॅली, डोडापथरी, वेरीनाग, बंगुस व्हॅली आणि युसमर्ग यांचा समावेश आहे.
तात्पुरती बंद करण्यात आलेली काही महत्त्वाची पर्यटनस्थळे:
गुरेज व्हॅली (बांदीपोरा जिल्हा) : नियंत्रणरेषेजवळ वसलेली, गेल्या काही वर्षांत पर्यटकांची पसंती मिळवलेली निसर्गरम्य व्हॅली.
बंगुस व्हॅली (कुपवारा जिल्हा) : शांत, रम्य वातावरण असलेले उत्तर काश्मीरमधील पर्यटनस्थळ.
वेरीनाग (अनंतनाग जिल्हा) : विख्यात झऱ्यांमुळे प्रसिद्ध असलेले निसर्गसुंदर ठिकाण.
कोसर्नाग तलाव (शोपियां जिल्हा) : साहसी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले उच्चावचं तलाव.
कामान पोस्ट (उरी) : ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण, नियंत्रणरेषेवर वसलेले.
याशिवाय, श्रीनगरमधील जामिया मशिदीतही पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक बंद करण्यात आलेल्या मार्गांवर पोलीस आणि निमलष्करी दलाचे चेकपोस्ट्स उभारले जाणार आहेत. पर्यटकांना केवळ ठराविक सुरक्षित क्षेत्रात फिरण्याची परवानगी असेल आणि संवेदनशील भागांत प्रवेशास बंदी राहील.
पहलगाम आणि गुलमर्ग यांसारखी प्रमुख पर्यटनस्थळे मात्र उघडी राहणार आहेत, पण या भागांतीलही काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या भीषण घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. सरकारने लगेचच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे