विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : तुम्ही मराठी बोलण्याबद्दल आम्हाला सांगत आहात, पण तुम्ही कुणाचे अन्न खाताय? महाराष्ट्रात टाटा, बिर्ला आणि रिलायन्स हे आयकर भरतात. आमच्या पैशांवर तुम्ही जगताय. तुम्ही कुठला आयकर भरत आहात? महाराष्ट्राबाहेर या तुम्हाला उचलून-उचलून आपटून मारू, असा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. ( BJP MP Nishikant Dubey threatens Step out of Maharashtra, Raj-Uddhav and I’ll thrash you)
हिंदी भाषा बोलण्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतिय लोकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर एका वृत्तसंस्थेशी बोलताना दुबे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना चांगलेच सुनावले, दुबे म्हणाले, “तुम्ही मराठी बोलण्याबद्दल आम्हाला सांगत आहात, पण तुम्ही कुणाचे अन्न खाताय? महाराष्ट्रात टाटा, बिर्ला आणि रिलायन्स हे आयकर भरतात. आमच्या पैशांवर तुम्ही जगताय. तुम्ही कुठला आयकर भरत आहात? तुमच्याकडे कुठले उद्योग आहेत? झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशाजवळ खाणी आहेत. तुमच्याकडे कुठल्या खाणी आहेत.”
“रिलायन्सने गुजरातमध्ये रिफायनरी बसवली आहे. सेमिकंडक्टर उद्योगसुद्धा गुजरातमध्ये येत आहेत. वरून तुम्ही आमचे शोषण करून कर भरत आहात. तुमच्या हिंमत असेल तर उर्दू, तामिळ किंवा तेलुगू भाषिकांना सुद्धा मारा. तुम्ही महाराष्ट्रात बॉस असाल तर बिहार, उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडूत चला. तुम्हाल उचलून-उचलून आपटून मारू, असा इशारा निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना दिला आहे.
आता मुंबई महापालिकेच्या निवडणूका असल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुकीची कामे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असाल तर माहीम येथील दर्ग्यासमोर जाऊन हिंदी-उर्दू भाषिकांना मारून दाखवावे,” असे आव्हान निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना दिलं आहे.
मीरा रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एका फास्ट फूड विक्रेत्याला मराठीत बोलला नाही म्हणून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. राज ठाकरे यांनीही मराठी विजय उत्सवाच्या मेळाव्यात बोलताना मराठी बोलत नाही त्यांना कानाखाली वाजवा असे आवाहन केले होते.
भोजपुरी अभिनेता आणि भाजप खासदार दिनेश लाल यादव उर्फ ‘निरहुआ’ याने “मी मराठी बोलत नाही, दम असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा, असे आव्हान दिले होते.