पुणे :भारतातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन होवो, सर्वत्र कायदा-सुव्यवस्था अबाधित राहो आणि देशबांधवांना सुस्थिती लाभो, असा संकल्प करीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि अभिषेक केला. ( BJP President J. P. Nadda anoints Dagdusheth Ganesha; prays for the country)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादाविरोधातील लढ्यात अधिकाधिक शक्ती लाभावी, यासाठीही त्यांनी गणरायाचरणी प्रार्थना केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे नड्डा यांचे मंदिरात औपचारिक स्वागत करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, तसेच प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती आमदार हेमंत रासने यांनी नड्डा यांना दिली.
यानंतर नड्डा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्याला सडेतोड उत्तर देण्याची अपेक्षा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करतो. भारत हे संकट पार करून अधिक शक्तीशाली बनेल आणि दोषींना योग्य शिक्षा मिळेल, असा विश्वास आहे. बुद्धी आणि शक्तीच्या बळावर भारत संकटातून मार्ग काढेल, यासाठी गणरायाकडे मी प्रार्थना केली आहे.”