विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे देशात तब्बल 14 कोटींच्यावर सदस्य नोंदणीचा आकडा गाठला आहे. यामध्ये महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक कोटी 80 लाख सदस्य नोंदणी करून सिंहाचा वाटा उचलला आहे. ( BJPs primary members in the country are over 14 crore Maharashtra has the lions share)
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी जाहीर केले की, भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व देशभरात १४ कोटींच्या वर पोहोचले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले, “भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व १४ कोटींच्या पुढे गेले आहे. प्रत्येक बूथस्तरीय कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमामुळे. हे शक्य झाले आहे भलेही आम्ही मेगा कॅम्पेन थांबवले असले, तरी बूथ पातळीवरील सक्रियतेनेच हा टप्पा गाठता आला आहे.”
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘भाजप सक्रिय सदस्यत्व अभियान’ सुरू करताना पक्षाचे पहिले सक्रिय सदस्य झाले. हे अभियान १६ ऑक्टोबर २०२४ रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले होते. यावेळी ‘संघटन पर्व सदस्यता मोहीम-२०२४’ च्या पुढच्या टप्प्याला प्रारंभ झाला.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले होते की, “सक्रिय सदस्य बनण्यासाठी एका कार्यकर्त्याने किमान ५० नवीन सदस्य नोंदवले पाहिजेत. हे सदस्य मांडळ समिती व त्यापुढील पदांकरिता निवडणूक लढवण्यास पात्र ठरतात. भविष्यात त्यांना पक्षाच्या विविध भूमिकांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.”
महाराष्ट्रातील आकडेवारीनुसार, ‘संगठन पर्व सदस्यता मोहीम’च्या तिसऱ्या टप्प्यात राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सदस्यांची भर पडली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सुमारे १.८ कोटी सदस्य नोंदवण्यात आले आहेत. विशेषत: मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिकसारख्या शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांमधूनही मोठ्या प्रमाणावर सदस्य जोडले गेले आहेत.
26 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या समवेत प्रातिनिधीक स्वरुपात सदस्य नोंदणी केंद्राचा ‘लक्ष्यपूर्ती’ प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.संघटन पर्वांतर्गत महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी 1 कोटी 51 लाख सदस्य नोंदणी करणारा भाजपा एकमेव पक्ष ठरला आहे. या सदस्य नोंदणी पर्वात प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने आपले योगदान दिले आहे., असे ते म्हणाले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात x या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक शक्तीचे हे मूर्त स्वरूप आहे. देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक मेहनतीचे, जिद्दीचे आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेचे हे फलित आहे. देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.महाराष्ट्रात मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र यांच्या नेतृत्वात दीड कोटी सदस्यसंख्येचा टप्पा पूर्ण करून या अभूतपूर्व विक्रमात आपण योगदान देऊ शकलो, याचा महाराष्ट्रातील आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे. देशाचे पंतप्रधान, विश्वगौरव आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या समोर विकसित भारताचा संकल्प ठेवला. या संकल्पाला देशवासीयांनी केवळ मतदानातून नव्हे, तर सदस्यता नोंदणी महाभियानात सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो अंत्योदयाचा संकल्प घेतलेली राष्ट्रनिर्माणाची चळवळ आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची वचने पूर्ण करणारा आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असलेला पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष.