विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (PoK) असलेल्या दहशतवादी तळांवर अचूक लष्करी कारवाई केली. या कारवाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव दिले. ( Blowing on pain Prime Minister Modi himself gave the name Operation Sindoor to the military operation)
२६ हिंदू पर्यटकांच्या हत्या करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर प्रतिउत्तर देताना या मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ ठेवून पंतप्रधानांनी देशाच्या हृदयातील दुःख, वेदना आणि बदल्याच्या भावनेला वाट मोकळी करून दिली . “सिंदूर” हे भारतीय स्त्रीच्या सन्मानाचे, सुरक्षिततेचे आणि श्रद्धेचे प्रतीक. या हल्ल्याने स्त्री-पुरुष, तरुण-प्रौढ सगळ्या भारतीयांच्या हृदयावर आघात झाला आणि म्हणूनच हे नाव संपूर्ण देशाच्या भावना प्रतिबिंबित करणारे ठरले.
भारतीय लष्कर आणि हवाई दलाने केलेल्या या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मद (JeM), लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांच्या तळांवर हल्ले करून ते नष्ट केले.
पंतप्रधान मोदींनी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांसोबत विशेष बैठक घेत या कारवाईस मान्यता दिली. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, “या देशाच्या महिलांच्या सिंदूर लावणाऱ्या हातांवर जर कुणी हल्ला करणार असेल, तर त्यांना त्याच भाषेत उत्तर मिळाले पाहिजे.”
या लष्करी कारवाईने केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या कठोर आणि निर्णायक भूमिकेचे दर्शन घडविण्यात्व आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक लष्करी कारवाई नसून, हे शहीदांच्या बलिदानाला वाहिलेली श्रद्धांजली आहे, असे मत देशभरातून व्यक्त होत आहे.