विशेष प्रतिनिधी
फुकेत : थायलंडमधील फुकेत शहरातून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या AI-379 या विमानाला गुरुवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घडामोडीमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली आणि सर्व १५६ प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले. ( Bomb threat on Air India flight from Phuket to Delhi Emergency landing in Thailand all 156 passengers safe)
AI-379 हे विमान फुकेत विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झालं होतं. काही वेळातच एअर ट्रॅफिक कंट्रोलला एका अज्ञात ईमेलवरून बॉम्ब असल्याचा इशारा मिळाला. त्या वेळी विमान अंदमान समुद्रावर होते. तातडीने सुरक्षेचे प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले आणि वैमानिकाने विमानाला पुन्हा फुकेतकडे वळवले.
विमानाने थेट फुकेतवर न उतरता समुद्रावर प्रदक्षिणा घालत, इंधन कमी केल्यावर सुरक्षित लँडिंग केली. संभाव्य स्फोट सावधगिरी म्हणून हे करण्यात आले. लँडिंगनंतर संपूर्ण विमान सुरक्षा यंत्रणांनी घेरलं, आणि बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड, तसेच स्थानिक पोलिस आणि एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्स यांनी शोध मोहीम सुरू केली.
विमानात असलेल्या १५६ प्रवाशांपैकी कोणालाही इजा झाली नाही. सर्वांना विमानातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना अन्न-पाण्याची व्यवस्था करून स्थानिक अधिकाऱ्यांकडून चौकशीही करण्यात आली.
या घटनेबाबत थायलंडच्या विमान सुरक्षा एजन्सीज आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय सुरू आहे. धमकी देणारी व्यक्ती किंवा गट कोण होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. सायबर क्राइम विभागाकडून ईमेलचा स्रोत ट्रॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ही बाब गंभीरतेने घेतली असून, थायलंडमधील दुतावासाशी संपर्कात आहे. एअर इंडियानेही प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री दिली असून, उर्वरित प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था लवकरच करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.