विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका खाजगी कंपनीच्या ईमेल आयडीवर विमानतळ तसेच विमानतळावरील विमानांमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा ईमेल प्राप्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Bomb threat on plane at Pune airport)
याप्रकरणी या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी आदनान शेख (वय २४, रा. कोंढवा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्टार एअर प्रायव्हेट कंपनीच्या ईमेल आयडीवर रविवारी (दि.२९) पहाटे दीड वाजता विमानतळ तसेच विमानतळावरील विमानांमध्ये बॉम्ब ठेवला आहे, अशा आशयाचा ईमेल प्राप्त झाला. सकाळी सात वाजता कंपनीच्या कर्मचार्यांनी तो ईमेल वाचला. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत विमानतळावरील नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर विमानतळावरील सुरक्षा विभागाकडून संपूर्ण विमानतळाची पाहणी करण्यात आली. दरम्यान, विमानातील प्रवासी तसेच विमानतळ परिसरातील नागरिक व प्रवाशांमध्ये खोटी माहिती आणि अफवा पसरवून भितीदायक वातावरण निर्माण केले तसेच त्यांच्या जिविताच्या सुरक्षिततेस धोका निर्माण केला म्हणून विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून पोलिसांकडून तांत्रिक तपास केला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.