विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पुरस्कार प्रदान केल्याने शरद पवार यांच्यावर आगपाखड करणाऱ्या खासदार संजय राऊत याना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही सुनावले आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श पायदळी तुडवून केवळ हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचाही अपमान आपण केला असा टोला त्यांनी राऊत याना लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कार देण्यावरुन संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. महादजी शिंदे यांचे वंशज असलेल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मराठा समाज सर्व पाहत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श पायदळी तुडवून केवळ हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचाही अपमान करणाऱ्या लोकांना मराठा सन्मान काय समजणार? ज्यांनी स्वतःच्या समाजात आपला जनाधार आणि सन्मान गमावला आहे ते इतरांचा सन्मान केल्यामुळे त्रस्त आहेत.
शरद पवार यांच्या हस्ते शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा संताप झाला. संजय राऊत यांनी यावरून संतापात शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.
पवार साहेबांची उंची, महाराष्ट्रातील देशातील त्यांचे राजकारणातील स्थान अतुलनीय आहे. शरद पवार या देशात असे राजकारणी आहेत की त्यांच्या मनात सूड, द्वेष कधीच निर्माण होत नाही. ज्या माणसाने पवार साहेबांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पक्ष, निशाणी पळवली सर्व केले पण त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आक्रोश आणि चिड दिसत नाही. हे खरं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे. राजकीय संवाद वाढायलाच हवे. मात्र ते वाढत नाही हे दुर्दैव, तुम्ही तर विरोधकांची चटणीच करायला घेतली आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.