विशेष प्रतिनिधी
मालेगाव : “औरंगजेब एक पवित्र माणूस होता” असा वादग्रस्त दावा करणाऱ्या माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ( Case registered against former MLA Asif Sheikh for calling Aurangzeb a holy man)
मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आसिफ शेख यांनी औरंगजेबाचे समर्थन करत म्हटले की, “औरंगजेब टोप्या शिवून आपला उदरनिर्वाह करत असे. तो सर्व धर्मांना समान मानणारा होता. त्याच्यावर राजकीय हेतूने चुकीच्या आरोपांचं खापर फोडलं जात आहे.” या वक्तव्यामुळे पुण्यातील दत्ता गायकवाड या नागरिकाने हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत शेख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
आसिफ शेख यांचा राजकीय प्रवासही वादग्रस्त ठरलेला आहे. 2014 मध्ये ते काँग्रेसकडून मालेगाव मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2019 मध्ये एआयएमआयएमच्या मुफ्ती इस्माईल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2022 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर त्यांनी 2024 मध्ये नवा राजकीय पक्ष “इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र” (ISLAM) स्थापन करत विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. तथापि, या निवडणुकीतही त्यांना अपयशच पदरी पडलं.
या वादग्रस्त विधानामुळे केवळ गुन्हा दाखल होऊन थांबलेलं नाही, तर सोशल मिडिया आणि राजकीय चर्चांमध्येही या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही सामाजिक संघटनांनी शेख यांच्या विरोधात त्वरित कठोर कारवाईची मागणी केली आहे.