विशेष प्रतिनिधी
पुणे : वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भवानी पेठेतील कासेवाडीत हा तोतया डॉक्टर छोटा दवाखाना चालवित होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली. ( Case registered against impersonator doctor who ran a clinic in Pune without a medical degree)
प्रमोद राजाराम गुंडू असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतया डॉक्टरचे नाव आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. वसुंधरा पाटील यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉक्टरांविरूद्ध कारवाईसाठी महापालिकेने एका शोध समितीची स्थापना केली आहे. तोतया डॉक्टर गुंडू भवानी पेठेतील कासेवाडी भागात छोटा दवाखाना चालवित आहे. त्याच्याकडे वैद्यकीय पदवी नाही. वैद्यकीय परिषदेची नोंदणी देखील नाही, अशी तक्रार डॉ. पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कासेवाडीत जाऊन संबंधित दवाखान्याची पाहणी केली. आरोग्य अधिकाऱ्यांनी गुंडूकडे वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. तेव्हा त्याच्याकडे प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. गुंड याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना तो रुग्णांवर उपचार करत असल्याचे डॉ. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गुंडू याचा दवाखाना बंद केला असून, याप्रकरणाचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे यांनी दिली.