विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) माजी शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा करण दीपक मानकर आणि त्याचे सासरे सुखेन सुरेशचंद्र शाह यांच्यावर बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समर्थ पोलिस ठाण्यात ही नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ( Case registered against Karan Mankar son of former NCP city president Deepak Mankar)
या प्रकरणात रेड हाऊस फाउंडेशनच्या शंतनू सॅम्युअल कुकडे याच्यावर यापूर्वीच दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा असून, दुसरा गुन्हा सामूहिक बलात्काराचा आहे. या गंभीर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांना कुकडे आणि त्याच्या साथीदार रोनक जैन यांच्या बँक खात्यातून मोठ्या रकमेचा आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळले.
या आर्थिक व्यवहाराचा तपशील तपासताना करण मानकर, त्याचे वडील दीपक मानकर, आणि सासरे सुखेन शाह यांच्या खात्यांतूनही लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. पोलिसांनी जबाब मागितल्यानंतर करण मानकर याने असा खुलासा केला की, डोणजे येथे दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनू कुकडे त्याला ५ कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज तब्बल ४० वर्षांच्या कालावधीसाठी असणार होते, असा दावा करणने केला.
कर्जविषयक करार ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करण्यात आल्याचे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी संबंधित कराराचा तपास केला असता, करण मानकरने पोलिसांना दिलेला दस्त क्रमांक दुसऱ्याच व्यक्तीने अधिकृतपणे खरेदी केला असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा दस्त बनावट असून, फसवणुकीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला.
या प्रकरणात शंतनू कुकडे, करण दीपक मानकर, सुखेन शाह आणि रोनक जैन यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती, आर्थिक गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलीस आर्थिक व्यवहारांबाबत तपासाचा वेग वाढवत असून, फसवणूक झालेल्या रकमेची निश्चिती केली जात आहे.