विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अनामत रक्कम मागितल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लवळे येथील सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्येही असाच प्रकार घडला आहे. वीस हजार रुपये भरल्याशिवाय ऑपरेशन करणार नाही असे म्हणणाऱ्या डॉक्टर विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Case registered against Symbiosis University Hospital doctor who said he would perform surgery only if paid)
ऑपरेशनसाठी २० हजार रुपये घेणाऱ्या लवळे येथील सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रवीण लोहोटे असे या डॉक्टरचे नाव आहे.
सिम्बॉयसिस विद्यापीठातर्फे मुळशी तालुक्यातील लवळे येथे धर्मादाय रुग्णालय चालविण्यात येते. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय आहे. एक महिला रुग्णाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. प्रकृती नाजूक असल्याने तातडीने ऑपरेशन करण्याची गरज होती. मात्र महिला पेशंट यांची प्रकृती नाजूक असून, तत्काळ उपचार करावे लागतील. पैसे भरले नाहीत तर पेशंट दगावू शकतो अशी भीती डॉक्टरांनी दाखविली. त्यासाठी वीस हजार रुपये घेण्यात आले.
धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणी असताना उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेण्यास मनाई आहे. महिलेच्या पुतण्याने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावरून पैसे दिले तरच ऑपरेशन केले जाईल अशी भीती दाखवत २० हजार रुपये घेणाऱ्या डॉ. प्रवीण लोहोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.