नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मोठा शैक्षणिक निर्णय घेतला आहे. २०२६ पासून १०वीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही माहिती देताना स्पष्ट केले की, ही नवी परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांवरील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने राबवली जाणार आहे. (CBSE Boards historic announcement 10th class exams to be held twice a year from 2026 Students will get a chance to improve their scores)
सीबीएसई च्या नव्या धोरणानुसार, पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरी परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा अनिवार्य असेल, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यात बसावेच लागेल. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ही पर्यायी असेल, जी केवळ त्या विद्यार्थ्यांसाठी असेल जे आपली पहिल्या परीक्षेतील कामगिरी सुधारू इच्छितात.
या पद्धतीत अंतिम गुणपत्रिका विद्यार्थ्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे तयार केली जाणार आहे. म्हणजे, जर एखादा विद्यार्थी फेब्रुवारीत कमी गुण घेत असेल आणि मे महिन्यातील परीक्षेत चांगले गुण मिळवत असेल, तर अंतिम निकालात मे महिन्याच्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील. मात्र, दोन्ही परीक्षांमधील गुण एकत्र केले जाणार नाहीत.
सीबीएसईने (CBSE) स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन (Internal Assessment) केवळ एकदाच केले जाईल. यामुळे शाळांमध्ये सतत मूल्यांकनाचे ओझं न राहता एकच स्पष्ट निकष राहील.
हा निर्णय केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) शिफारशीनुसार घेण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार, विद्यार्थ्यांची परीक्षेकडे केवळ निकाल देणारी प्रक्रिया म्हणून न पाहता ते त्यांच्या समग्र विकासाचं माध्यम असावं, अशी भूमिका आहे.
CBSE ने म्हटलं आहे की, “विद्यार्थ्याच्या ज्ञानाचे, कौशल्याचे आणि सर्जनशीलतेचे मूल्यांकन केवळ एका परीक्षेवर आधारित करून त्याच्या संपूर्ण क्षमतेचा अंदाज घेणे अयोग्य ठरते. त्याला सुधारणेची संधी असली पाहिजे.”