विशेष प्रतिनिधी
अकोला: नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू भाजपची साथ सोडून गेल्या नंतरची सोय सध्या भाजप बघत आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांनी केला आहे . ( Nitish, Chandrababu out, Sharad Pawar, Uddhav Thackeray with BJP, Bachu Kadu’s claim)
कडू म्हणाले की ज्या पद्धतीने नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत आहे. यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहाता संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे . आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे.
भाजपवर टीका करताना कडू म्हणाले, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून, भाजपची मोगलाई निती आहे. त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात हीच भाजपची निती आहे.
राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजी बाबत बोलताना ते म्हणाले, जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचे की ते अति खूश असतात आणि जेव्हा ते अति खूश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात.