विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील कथित हिंदी सक्तीवरून वाद पेटला असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिंदी विरोधकांची पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे. हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. माझ्याकडे सगळ्यांचे रेकॉर्ड्स आहेत. उद्या यादी जाहीर करणार आहे की, कोणाची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकली, असे पाटील म्हणाले.
( Chandrakant Patil warns that the list of whose children studied in the convent will be announced)
मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात आता मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा निघणार आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट हेही मोर्चात सहभागी होणार आहेत. यावर बोलताना पाटील म्हणाले, सरकार वारंवार असे म्हणते आहे की, आम्ही हिंदीची सक्ती करत नाही. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पंतप्रधान मोदी आग्रह धरला की, शिक्षण हे मातृभाषेतून मिळायला पाहिजे. आपल्याला आपली मुले महाराष्ट्रातच राहावी असे वाटत असेल, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पहिलीपासून इंग्रजीही सक्तीची नको, कारण ती विद्यार्थ्यांना झेपत नाही. झेपण्याचा विषय असेल तर ओके? हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. माझ्याकडे सगळ्यांचे रेकॉर्ड्स आहेत. उद्या यादी जाहीर करणार आहे की, कोणाची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकली, यादीच देतो.
आपण जर्मन, फ्रेंच शिकवायला तयार आहोत, मग एवढा हिंदीचा विरोध कुठून आला? दादांना राज ठाकरेंकडे पाठवले, त्यांना त्रिभाषा धोरण काय आहे, हे समजावून सांगितले. हा त्रिभाषा फॉर्म्युला उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला आहे. हा ते वाचत नसतील. तुम्हाला सरकार जास्त दिवस चालवायला मिळाले नाही, त्यामुळे तो रिपोर्ट आम्ही अंमलात आणत आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
देशामध्ये ५५ टक्के लोकसंख्या हिंदी भाषिक आहेत. मुंबईत दीड कोटी लोक अमराठी आहेत. त्यांच्याशी बोलताना हिंदी हवी की नको? हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. इंग्रजी चालते, पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.