विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच त्यांनी केले अशी टीका महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ( Chandrashekhar Bawankule criticizes Uddhav Thackeray for his lack of support but the outcry grew as he was overcome by despair over defeat.)
शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा काल झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर बावनकुळे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी म्हटले आहे की , “शिवसेना संपली नाही,” असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी तर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभ सोडून उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या चरणी नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप करणे सोपे आहे, पण हे नेते जेव्हा देशभर, राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीतून ऑनलाइन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेने बघितले आहे.
जे ‘मुंबई आमची’ म्हणतात, त्यांनी आधी सांगावे की, मुंबईतील मराठी माणसांसाठी काय केले? महापालिकेत सत्ता असतानाही त्यांच्या झोपड्या, पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य यावर काही केले का? मुंबईकरांसाठी कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्वसन योजना या देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने झाल्या आहेत, हे मुंबईकरांना माहीत आहे, असेही त्यांनी सुनावले.
उद्धव ठाकरे यांनी अशीच गरळ ओकत राहावी, टिंगल- टवाळी करीत राहावी, टोमणे मारत राहावे. त्यांचे पुढील आयुष्य यातच जाणार आहे. मुंबई आमची आहे, हे उद्धव ठाकरे यांना ओरडून सांगत राहू दे; पण विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा असेल तर, मुंबईवर भाजपाप्रणित महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे, हीच मुंबईकरांची इच्छा आहे! लोकसेवा आणि लोककल्याणासाठी मनात तळमळ असावी लागते, ती त्यांच्यात नाही, ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला यापूर्वीच कळलेली आहे. आता पुढील निवडणुकांमध्ये जनता त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.