विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आयकर विभागाच्या नावाखाली तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य संशयित राहुल भुसारे याला अटक केली आहे. ( Chhagan Bhujbal was threatened with a raid by the Income Tax Department and demanded a ransom of Rs 1 crore.)
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवले भुजबळ यांच्या फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे सांगत आयकर विभागाची छापेमारी होणार असल्याचा खोटा इशारा दिला. यानंतर आरोपीने “मी देखील त्या टीमचा भाग आहे, तुम्हाला मदत हवी असल्यास १ कोटी रुपये द्यावे लागतील” असे म्हणत खंडणीची मागणी केली.
छगन भुजबळ यांनी याबाबत सांगितले की माझी पीएला साहेबांशी बोलायचे म्हणून फोन आला. त्याने काय काम आहे विचारले. त्यावर आरोपी म्हणाला भुजबळ यांचे त्र्यंबकेश्वर येथे फॉर्म हाऊस आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॅश आहे. आयकर विभाग याठिकाणी रेड टाकणार आहे. तुम्हाला यातून वाचायचे असेल तर एक कोटी रुपये द्या. त्याचे सतत फोन येऊ लागल्याने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे तक्रार दिली.
या प्रकरणी छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी माहितीच्या आधारे कारवाई करत नाशिक-गुजरात महामार्गावरील करंजाळी येथे सापळा रचून आरोपीला अटक केली.
गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने राहुल भुसारेला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात फसवणूक, खंडणी आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.