विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( Chhatrapati Shivaji Maharaj Gaurav Circuit is an inspiring journeysays Chief Minister Devendra Fadnavis)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वातंत्र्य इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आज या रेल्वेतून सातशे पेक्षा जात प्रवासी प्रवास करत आहेत. यातील ८० टक्के प्रवासी हे चाळीस वर्षाच्या आतील आहेत. जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत. राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शिवराज्याभिषेकास ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मोगल, परकीय आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढे हे स्वराज्य अटकेपर्यंत विस्तारले. ही गौरव यात्रेचा आजचा मुक्काम रायगड येथे असणार आहे. तसेच या यात्रेत शिवनेरी, लालमहाल, पुण्याची शिवसृष्टी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहे. तर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन ही होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच राज्याचे संस्कृती कार्य मंत्री आशिष शेलार आणि त्यांचा विभाग, पर्यटन विभाग यांचे अभिनंदन करतो.
या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम आयोजित केले आहेत.
भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली ट्रेनचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल.भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे.
सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयरसीटीसी च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल
सहल तपशील :
पाच दिवसांची ही यात्रा पुढील ठिकाणांना भेट देणार आहे. रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.