विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत शिवरायांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला असून महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक ठरणार असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
( Chhatrapati Shivaji Maharajs statue will inspire future generations believes Chief Minister Devendra Fadnavis)
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेऊन व पूजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार नारायण राणे, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, निलेश राणे, निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेला पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे कोसळला होता.या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा व वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करत नव्यानं पुतळा उभारला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत पुतळ्याचे काम पूर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे.
आय.आय.टी.,जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे देखील पुतळा उभारणीत मोलाचे योगदान लाभले असून मी सर्वांचे अभिनंदन करतो. पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे व वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. याची उंची पाहता महाराजांचा हा देशातील बहुदा सर्वात उंच पुतळा ठरेल. पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शिवरायांच्या दूरदर्शी विचारांचा साक्षीदार असलेल्या सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज दर्शन व पूजन करण्याचे सौभाग्य लाभले. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा त्यांचा अद्वितीय पराक्रम आणि सागरी सीमांच्या रक्षणासाठी असणारी त्यांची दूरदृष्टी, याची साक्ष पुढच्या पिढ्यांना देत राहील’, अशी पोस्ट फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून केली
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा अभिमान, स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहे. हा पुतळा इथे येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी एक आदराचे स्मारक ठरणार असल्याचेही ते म्हणाले.