विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘छावा’ या चित्रपटातील वादग्रस्त लेझीम खेळतानाचा प्रसंग अखेर काढून टाकण्यात आला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ( The controversial Scene of playing Lazim in the film ‘Chhawa’ has been removed)
‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मात्र काहींनी त्यातील एका दृश्यावरून आक्षेप नोंदवला होता. तो सीन काढल्याशिवाय आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली होती. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद उपस्थित झाला आहे. या वादानंतर आता लक्ष्मण उतेकर हे राज ठाकरेंना भेटणार आहेत. त्यापूर्वी चित्रपटातील वादग्रस्त भाग काढून टाकल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
दिग्दर्शकांनी ‘छावा’ या चित्रपटातील छत्रपची संभाजी महाराजांचा नाचण्याचा भाग काढून टाकल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. नृत्य दाखवल्यावरून झालेला वाद आता थांबला असेल, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली. “मी स्वत: चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन केला होता. त्यानंतर घडलेली सकारात्मक गोष्ट म्हणजे चित्रपटातील नाचण्याचा भाग त्यांनी काढून टाकला आहे”, असं ते म्हणाले. ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा सामंतांनी दिला होता.
या चित्रपटाविषयी त्यांनी एक्स (ट्विटक) अकाऊंटवर पोस्ट लिहिली होती. धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणं ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मतं व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता चित्रपटातील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे.