विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या 10 दिवसांच्या रेल्वे टूरची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे. (Chief Minister announces 10day rail tour showcasing the history of Shivaji Maharaj )
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. अतिशय सुंदर आयकॉनिक रेल्वेची दहा दिवसांची टूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचे किल्ले आणि महाराजांशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना जोडणार आहे. त्यासाठी रेल्वे मंत्र्यांचे मी आभार मानतो.
या वर्षी देखीलमहाराष्ट्राला जवळपास 23700 कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळाले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गोंदिया–बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेकरीकरणाकरता 4 हजार 819 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. यामुळे निश्चितपणे विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. छत्तीसगड आणि तेलंगणासाठी व्यापार, व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची रेल्वे लाईन आहे. गोंदियातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजिक लाईन मंजूर झाल्याने मी मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जवळपास 1 लाख 73 हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशन रेल्वे विभागाकडून रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल देखील आहे. जवळपास राज्यातील सर्वच स्टेशनचे वर्डक्लासमध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे.
मुखमंत्री म्हणाले की, युपीएच्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला 10 हजार कोटी रुपयेही एकत्रितपणे मिळाले नाही. यावर्षीदेखील जवळपास 23700 कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळाले आहे. मोदीजींच्या सरकारमध्ये आता दरवर्षी 23 हजार 25 हजार कोटी रुपये आपल्याला अपग्रेडेशनसाठी मिळत आहे. यात नवीन रेल्वे लाईन देखील सुरू होत आहे.
महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे या प्रकल्पांमुळे राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारेल आणि विशेषतः विदर्भाला मोठा फायदा होईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.