विशेष प्रतिनिधी
मुंबई : वडीलांची हत्या, त्यातून उभ्या राहिलेल्या आंदाेलनात सक्रीय सहभाग आणि कुटुंबाची काळजी घेत मस्साजोगचे सरपंच संतोष यांची कन्या वैभवीने बारावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळविले. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुख हिला फोन करून तिचे अभिनंदन केले. पत्र लिहून सदैव पाठीशी राहण्याचा विश्वास दिला आहे. ( Chief Minister congratulates Vaibhavi Deshmukhstrong support and encouragement always at his side)
संताेष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर दोन महिन्यांत त्यांची कन्या वैभवी देशमुख हिने दुःखाचा डोंगर पेलत बारावीची परीक्षा दिली. बारावीच्या परीक्षेत वैभवीने बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळवून यश संपादित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तिचे स्वत: अभिनंदन तर केलेच पण एक पत्रही लिहिले आहे. अंबाजोगाईचे एसडीओ दीपक वाजळे यांनी वैभवी देशमुख हिला प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांचे पत्र दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की,
अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस, तुझे अतिशय मनापासून अभिनंदन. मला याची जाणिव आहे की, तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडील स्व. संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण, तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप आज संपूर्ण महाराष्ट्र देतोय. 85.33 टक्के गुण संपादन करुन तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केला आहेस. तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू अशीच प्रगती करीत रहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव सोबत आहेतच. तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल. भावी वाटचालीसाठी तुला अनेकानेक शुभेच्छा.