विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘ हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ( Chief Minister Devendra Fadnavis announces to plant 10 crore trees in the state)
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पुढील वर्षीही 10 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
राज्यातील 33 टक्के वनाच्छदनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील 20 वर्षे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हे अभियान मोहिम स्वरुपात राबविणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी 33 कोटी आणि 50 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करता येईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, वृक्षारोपणात किमान दीड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्यात यावीत. लावलेली झाडे टिकतील, वाढतील यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच लावलेल्या वृक्षारोपणाची जगण्याची टक्केवारी वाढावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच यासाठी रिमोट सेन्सिंग, उपग्रह आदी साधनांचाही वापर करून पारदर्शकपणे कामे होण्याकडे लक्ष द्यावे.
10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी सर्व विभागांनी जागा तसेच दर्जेदार रोपे निश्चित करावीत. वृक्षारोपण मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांनी सहभाग घ्यावा. तसेच सामाजिक संस्थांनाही यामध्ये सहभागी करून घ्यावे. दहा कोटी झाडे लागवडीच्या मोहिमेच्या यशाचे गमक हे चांगली नर्सरी आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्तीसाठी आवश्यक आणि दर्जेदार रोपे मिळावीत,यासाठी नर्सरी तयार करणे आवश्यक आहे. तसेच खासगी नर्सरीमध्ये चांगली रोपे तयार होतील, याकडे लक्ष द्यावे. प्रादेशिक परिस्थितीनुसार झाडांची लागवड करण्यात यावी. वृक्षारोपण अभियानाच्या कामासाठी ‘कॅम्पा’अंतर्गतचा निधीचा पुरेपूर वापर करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच पालखी मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करण्याच्या कामाची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपविण्यात येईल. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील वर्षी गडचिरोली जिल्ह्यात 1 कोटी झाडे लावण्याचा विचार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय जोतिबाच्या डोंगरावही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.