विशेष प्रतिनिधी
मुंबई : विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
( Chief Minister Devendra Fadnavis believes that incorporating positive ideology into youth policy will bring about change.)
विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, श्रीकांत भारतीय, संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, प्रवीण दटके, देवेंद्र कोठे, सुहास कांदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रकाश सुर्वे, वरुण सरदेसाई, रोहित पाटील, युवा बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, आयुक्त शीतल तेली तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युवकांचे विचार, त्यांच्या अपेक्षा समजून घेत धोरण आखले गेले तर ते समर्पक ठरेल. शहरी व ग्रामीण भागातील युवकांना समान संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण, सुविधा आणि योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करणे आवश्यक आहे. युवक कल्याण विभागाबरोबरच अन्य विभागांनीही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनाही धोरणात सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले.
यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांच्या गरजा ओळखून, देश-विदेशातील युवकांबाबतच्या धोरणांचा अभ्यास करून, प्रत्यक्ष संवादातून उपाययोजना आखल्या जातील.
नवे सुधारित युवा धोरण यामध्ये शिक्षण, रोजगार, उद्योजकता, बौद्धिक व सामाजिक विकास, स्टार्टअप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) याबरोबरच जबाबदारीची जाणीव, राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण रुजवणे यावर भर दिला जाणार आहे. यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील योजना, युवा प्रशिक्षण केंद्र, युवा पुरस्कार, वसतिगृहे, महोत्सव, व्यक्तिमत्व विकास उपक्रम, युवा निधी आणि युवा प्रतिष्ठा निर्देशांक आदी बाबींचा समावेश केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.