मुंबई: पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. ( Chief Minister Devendra Fadnavis expressed grief over the tragedy of the collapse of the bridge on the Indrayani river.)
शोक संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.