विशेष प्रतिनिधी
मुंबई : परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हत्या आणि गेल्या 21 महिन्यांचा ऐकूण मुख्यमंत्री भावुक झाले. त्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देत या प्रकरणात कुणीही असो, त्याला सोडणार नाही असा शब्दही दिला.
( Chief Minister Devendra Fadnavis gets emotional during meeting with Dnyaneshwari Munde orders to form SIT in Mahadev Munde murder case)
महादेव मुडें हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परळीत दोन वर्षांपूर्वी, 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच कराड गँगचे इतरही सदस्य यामध्ये असून पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, “महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेल्या 21 महिन्यांचा वृत्तांत मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. हे सर्व ऐकूण मुख्यमंत्री भावुक झाले. या प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं.”
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, “महादेव मुंडे हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली आणि आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यांनी तात्काळ बीडच्या एसपींना फोन लावला आणि या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.”
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, “पोलिस प्रशासनाला परळीतील बंगल्यावरुन फोन आला आणि त्यांनी तपास थांबवला अशी माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली. तो फोन धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरुन वाल्मिक कराडने केला आहे. यामध्ये अजून कुणी आहे का याचा सीडीआर काढण्याची विनंती आम्ही केली. या हत्येमध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांची नावे आपण मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. यावर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, सगळ्यांना अटक करणार असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला.”
ज्ञानेश्वरी मुडेंनी केलेल्या मागणीनुसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.