विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. ( Chief Minister Devendra Fadnavis orders Dhananjay Munde to resign)
देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे सुरूवातीपासूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. पण धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे अजितदादांनी निर्णय घ्यावा असं फडणवीसांनी सांगितलं होतं. अखेर फडणवीसांनी त्यांना आज राजीनामा देण्यास सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी धनंजय मुंडे आजा राजीनामा देतात का याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.