विशेष प्रतिनिधी
मुंबई : वनस्पती, पशुपक्षी, आदिवासी जीवन आणि निसर्गाच्या गूढतेचा अन्वय लावणारे महाराष्ट्राचे अरण्यऋषी, ज्येष्ठ लेखक आणि पक्षीतज्ज्ञ पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना नुकताच भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र साहित्य आणि पर्यावरण चळवळीने एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ( Chief Minister Devendra Fadnavis pays emotional tribute to Maruti Chitampallywho gave words to nature)
चितमपल्ली हे सोलापूर जिल्ह्यातील निवासी होते. त्यांनी वनसेवेतील आपले आयुष्य निसर्गाशी समरस होत घालवले. वन विभागात दीर्घकाळ सेवा बजावताना त्यांनी केवळ नोकरी केली नाही, तर निसर्गाशी संवाद साधत एक वैचारिक संपदा निर्माण केली. त्यांच्या लेखनातून जंगलातील जीवन, आदिवासींचे पारंपरिक ज्ञान आणि पक्ष्यांच्या भाषेचे अद्भुत दर्शन घडले. ‘वनोपनिषद’, ‘पक्षीकोश’, ‘पाऊस आला होता’, ‘तांबट’ यांसारख्या अनेक ग्रंथांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, “चितमपल्ली सर हे निसर्गाशी संवाद साधणारे शब्दसाधक होते. निसर्गाला शब्दरूपाने सजवत त्यांनी विपुल साहित्यसंपदा जनतेसमोर ठेवली. त्यांचे लेखन हे केवळ साहित्य नव्हे तर एक वैचारिक आणि शास्त्रीय ठेवा आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या ज्ञानाला प्रतिष्ठा दिली आणि पक्ष्यांच्या जीवनशैलीचा शास्त्रीय अभ्यास लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्यासारखा व्यक्तिमत्त्व विरळाच असतो.”
13 भाषा जाणणारे चितमपल्ली सर हे ज्ञानाच्या खऱ्या अर्थाने उपासक होते. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून विज्ञान व संस्कृती यांचा सेतू घालण्याचे कार्य केले. त्यांनी आपली सेवा अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही बजावली होती. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, पण त्यानंतरच त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला. हे वृत्त अत्यंत दु:खद आणि मनाला चटका लावणारे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.