विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : नक्षलवाद संपवण्याचा निर्धार करून गडचिरोली जिल्ह्याला विकासाची नवी पहाट दाखवण्यासाठी पालकमंत्री पद स्वीकारलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या टोकावरील दुर्गम आऊटपोस्टला भेट दिली. सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य वाढावे म्हणून मी अशा दुर्गम आऊटपोस्टवर येत असतो, असे त्यांनी सांगितले. ( Chief Minister Devendra Fadnavis visits remote outpost on the edge of Maharashtra to boost morale of security forces)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण आता महाराष्ट्राच्या पहिल्या पॉईंटवर आलो आहोत. छत्तीसगड अगदी आपल्या नजरेत दिसेल एवढ्या जवळ आहे. कवंडेच्या पोलिस आऊटपोस्टमुळे या भागातील सुरक्षेचा एक मोठा बॅकलॉग भरून निघाला आहे. हा भाग आजपर्यंत अनकनेक्टेड होता. आता इथे पोलिस आल्यामुळे शासनाच्या सर्व योजना, त्यांचे लाभ लोकांना मिळतील. लोकांचा सरकारवरील विश्वास वाढेल. सध्या हा संपूर्ण भाग पोलिस व शासनाच्या अधिपत्याखाली आला आहे. आता माओवाद्यांना इथे कोणतीही कारवाई करता येणार नाही.
माझ्या एवढा गडचिरोलीत फिरणारा दुसरा कोणताही मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाही असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, या ठिकाणी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती आपले सुरक्षा जवान चांगले काम करत आहेत. या सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य वाढावे म्हणून मी अशा दुर्गम आऊटपोस्टवर येत असतो. सरकार लवकरच गडचिरोलीतील माओवाद पूर्णतः संपुष्टात आणेल. 2014 पूर्वी गडचिरोली विकास व विकासाची क्षमता ही केवळ नेत्यांच्या भाषणांतच दिसून येत होती. पण त्यानंतर आम्ही गडचिरोलीत प्रत्यक्ष बदल घडवून आणले. पण आता आपल्याला इथे औद्योगिक विकास साधताना येथील जंगल व जमीन वाचवून विकास साधायचा आहे. गडचिरोलीचा नैसर्गिक स्वभाव बदलण्याचा प्रयत्न होणार नाही, असे ते म्हणाले.
गडचिरोली पोलिसांतर्फे येथील पोलिस मुख्यालयात आत्मसमर्पित नक्षली तरुण-तरुणींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा पार पडला. त्यात जवळपास 13 आत्मसमर्पित नक्षल युवक – युवती लग्नबंधनात अडकले. तत्पूर्वी गडचिरोली पोलिस दलाच्या बँड पथकाने आपल्या मुख्यालय परिसरातून वधू-वरांची वाजत-गाजत मिरवणूक काढली. या वरातीत पोलिस कर्मचारी वऱ्हाडी बनवून सहभागी झाले होते.